Baramati Jewelry Theft: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकुल असतानाच, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या अंत्यविधीवेळी उसळलेल्या जनसागराचा फायदा घेत साखळी चोरट्यांनी आपला हात साफ केला. या गर्दीत चोरट्यांनी तब्बल 15 जणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले असून, त्याची अंदाजे किंमत 25 ते 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रचंड गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा
दरम्यान, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो समर्थक बारामतीत दाखल झाले होते. संपूर्ण शहर भावूक झालेले असताना आणि लोकांचे लक्ष पार्थिवाकडे असताना, चोरट्यांच्या टोळीने गर्दीत शिरून सोन्याच्या साखळ्या ओरबाडण्यास सुरुवात केली. एका बाजूला शोककळा पसरलेली असताना दुसरीकडे चोरटे चोरीत व्यस्त होते, यावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
8 हजार पोलिसांचा फौजफाटा असतानाही धाडस
विशेष म्हणजे, अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुमारे 8 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतक्या मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित असतानाही चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, सतर्क नागरिकांनी काही संशयितांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बाधितांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद युनूस, राजकुमार आठवले, एजाज मिरावाले, मोहम्मद सिराज आणि बाळू बोत्रे यांच्यासह इतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस या सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून, चोरीला गेलेले दागिने हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.