Bhandara Tiger Attack: भंडारा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून वाघाने उच्छाद मांडला असून, अवघ्या पंधरवड्यात तीन जणांवर हल्ले झाले आहेत. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून संतप्त गावकऱ्यांनी आता वनविभागाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
शेतीची कामे ठप्प
वाघाच्या भीतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. शेतकरी आणि शेतमजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. मिरची तोडणीचा हंगाम असतानाही मजूर कामावर येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. एका महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “वाघाच्या भीतीने आम्ही शेतात जाऊ शकत नाही, त्यामुळे मक्याच्या पिकाचेही नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी वाघ येत असल्याने पिकाची राखण करणे कठीण झाले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा.”
वनविभागाला 8 दिवसांचा ‘अल्टिमेटम’
यापूर्वी गावकऱ्यांनी वाघाच्या दहशतीविरोधात रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी वनविभागाने 8 दिवसांत वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता 15 दिवस उलटूनही वाघ मोकाटच असल्याने गावकरी अधिक आक्रमक झाले आहेत. “जर वनविभागाने तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
180 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आणि ‘ट्रॅकलायझेशन गन’ सज्ज
वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने आता कंबर कसली आहे. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 17 ते 18 विशेष पथके (Teams) तैनात करण्यात आली असून एकूण 180 कर्मचाऱ्यांचा ताफा या मोहिमेत सहभागी आहे. वाघाचे ठसे (Footprints) आणि लोकेशन शोधण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी ‘बीट्स’ तयार करण्यात आले आहेत.
बेशुद्ध करून जेरबंद करण्याची तयारी
वनविभागाकडे ‘ट्रॅकलायझेशन गन’ (बेशुद्ध करण्याचे शस्त्र) उपलब्ध असून वाघाचे नेमके लोकेशन मिळताच त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले जाईल, असे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाघीण नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.