Mira Bhayandar Tree Collapse: पेट्रोल भरायला गेलेल्या तरुणावर काळाची झडप; माजी उपनगराध्यक्षाच्या 33 वर्षांच्या लेकाचा झाड कोसळून करुण अंत

राहुल हा भाईंदर जवळील मूर्धा गावाचा रहिवासी होता. बुधवारी, 1 जुलै रोजी सकाळी तो आपल्या मूर्धा गावातून राई गावाकडे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी निघाला होता.

Mira Bhayandar Tree Collapse: पेट्रोल भरायला गेलेल्या तरुणावर काळाची झडप; माजी उपनगराध्यक्षाच्या 33 वर्षांच्या लेकाचा झाड कोसळून करुण अंत

Mira Bhayandar Tree Collapse: मिरा-भाईंदर शहरात 1 जुलै रोजी घडलेल्या एका भीषण अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा आज, शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. 33 वर्षीय राहुल पाटील असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मिरा-भाईंदरचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा सुपुत्र होता. राहुल हा भाईंदर जवळील मूर्धा गावाचा रहिवासी होता. बुधवारी, 1 जुलै रोजी सकाळी तो आपल्या मूर्धा गावातून राई गावाकडे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान जोरदार वारा आणि पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक नारळाचे झाड थेट धावत्या राहुलच्या अंगावर उन्मळून पडले. या भीषण अपघातात राहुलच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.

रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
झाड अंगावर कोसळल्यानंतर घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत राहुलला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मानेला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती काल, गुरुवारी अधिकच ढासळली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही आज, शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. राहुलच्या या अकाली जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण मिरा-भाईंदर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप
गेल्या आठवड्यापासून शहरात फारसा मुसळधार पाऊस झालेला नसून केवळ रिमझिम सुरू आहे. तरीही अनेक भागांत झाडे उन्मळून पडण्याचे सत्र सुरूच आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि त्यांची छाटणी वेळेत न झाल्यामुळेच राहुलला आपला जीव गमवावा लागल्याचा थेट आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शहरातील सर्व धोकादायक झाडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar: सातबारा नोंदीसाठी संघर्ष; पैठण तहसील कार्यालयात महिलेने उचललं टोकाचं पाऊल

दोन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये 11 वर्षांच्या विहानचा गेला होता जीव
झाड अंगावर कोसळून मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी अत्यंत वेदनादायी घटना आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर भागातील 11 व्या गल्लीत एका इमारतीबाहेर असलेले जुने पिंपळाचे झाड अचानक रस्त्यावरील स्कूल बसवर कोसळले होते. ही बस 'युनिव्हर्सल हायस्कूल'च्या 14 विद्यार्थ्यांना घेऊन घरी सोडण्यासाठी निघाली होती. एका विद्यार्थ्याला उतरवण्यासाठी बस थांबली असतानाच हा अपघात घडला, ज्यामध्ये 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तव या निष्पाप बालकाचा अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाला. विहानच्या अपघाताची बातमी ऐकून त्याच्या आईला आणि सहकाऱ्यांना प्रचंड धक्का बसला होता. मुंबई आणि उपनगरांमधील या लागोपाठच्या दोन दुर्घटनांमुळे पावसाळ्यातील पादचारी आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number