Sunday, January 25, 2026 09:11:50 AM

Indian Railway: भविकांसाठी मोठी भेट! शिर्डी–तिरुपती एक्सप्रेस धावणार, राज्यात 11 स्थानकांवर थांबा

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचे उद्घाटन केले असून ही दक्षिण किनारपट्टीपासून शिर्डीपर्यंतची पहिली थेट रेल्वे सेवा आहे.

indian railway भविकांसाठी मोठी भेट शिर्डी–तिरुपती एक्सप्रेस धावणार राज्यात 11 स्थानकांवर थांबा

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या महत्त्वपूर्ण रेल्वेसेवेचा शुभारंभ केला. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वे दळणवळणाला नवी दिशा देणारी ही सेवा भाविकांसाठी मोठा दिलासा देणार आहे. विशेष म्हणजे, दक्षिण किनारपट्टी भागातून शिर्डीपर्यंत जाणारी ही पहिली थेट ट्रेन असून, तिरुपती व शिर्डी या दोन राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे.

या नव्या साप्ताहिक गाडीमुळे यात्रेकरूंचे प्रवासाचे पर्याय वाढतील, तसेच मार्गालगतच्या शहरांमधील आर्थिक क्रियाशीलताही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिरुपती-शिर्डी दरम्यानचा एकमार्गी प्रवास सुमारे 30 तास इतका असेल. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या गाडीतील सुविधा, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासामुळे भक्तांना अधिक आनंददायी अनुभव मिळेल आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. गाडीच्या उद्घाटनावेळी बोलताना सोमन्ना म्हणाले की, भारतीय रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या विविध संस्कृतींना जोडणारी एक सशक्त जीवनरेखा आहे.

हेही वाचा: Ghodbunder Road News: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; घोडबंदर रोड तीन दिवस अवजड वाहनांसाठी बंद

तिरुपती-शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा चार राज्यांतील लाखो भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा क्षण आहे. या सेवेमुळे शिर्डी, तिरुपतीसह नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड आदी 31 महत्त्वाच्या स्थानकांना थेट जोडले जाणार आहे, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या गाडीमार्गामुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद प्रदेशातील प्रवाशांना अधिक सुलभ कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. शिवभक्तांचे प्रमुख तीर्थस्थान असलेल्या परळी वैजनाथलाही या गाडीचा थेट लाभ मिळणार असून, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत फलदायी ठरणार आहे. तिरुपती परिसरातील सुविधांसाठी रेल्वेने 312 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याची माहितीही सोमन्ना यांनी दिली.

महाराष्ट्रातील या नव्या तिरुपती-शिर्डी एक्सप्रेसचे थांबे शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड आणि उदगीर अशी एकूण 12 प्रमुख स्थानके आहेत. या मार्गावरील थांब्यांमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या भागाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून, यात्रेकरू व सामान्य प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल. तिरुपती-शिर्डी एक्सप्रेसच्या सुरू होण्याने धार्मिक पर्यटन, प्रादेशिक संपर्क आणि आर्थिक विकास या तिन्ही क्षेत्रांना गती मिळेल, असा उत्साह भाविकांमध्ये दिसून येत असून, त्यांच्यासाठी हा प्रवास आता अधिक सहजसोप्या पद्धतीने शक्य झाला आहे.

हेही वाचा: Indigo Flight Crisis: 'इंडिगो संकट वाढत असताना तुम्ही काय करत होतात?', दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

 

सम्बन्धित सामग्री