सुहास पाटील, प्रतिनिधी
कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगरी दुर्गम भागातील सडा वाघापूर गावातील शकुंतला काकडे या 85 वर्षाच्या निराधार बेघर आजीला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने एका महिन्यात घर बांधून देत निवारा दिला. राजकारणात असुनही माणुसकी जपत लोकनेत्यांचा वारसा पुढे चालवला. सडा वाघापूर येथे प्रचार सभेत शकुंतला काकडे या आजीने मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानले आणि भरभरून आशीर्वाद दिला.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे दौऱ्यावर असताना पाटण मरळी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अचानक एक ८०–८५ वर्षांच्या निराधार आजीबाई शकुंतला काकडे थरथरत्या पावलांनी तिथे आल्या होत्या. शंभुराज देसाई यांनी आजीची विचारपूस केली असता आजीने सांगितले की, 'मला कोणी नाही… छोटेसे घर होते. लोकनेते साहेबांनी दिलेले पत्रे खराब झाले, घर पडले आहे, रात्री जंगली जनावरांची भीती वाटते साहेब. माझं काहीतरी करा…', अशी विनवणी केली.
हेही वाचा : Sanjay Raut: ' अजित पवार यांना भाजपाकडून वारंवार धमक्या ... ' संजय राऊत यांचा भाजपावर आरोप
हे ऐकताच मंत्री देसाई यांनी क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले की, “आजी, काळजी करू नका. तुमचं घर मी बांधून देतो. तुम्ही आधी चहा-नाश्ता घ्या.” आणि लगेच स्वीय सहाय्यक यांना आदेश दिले की, “आजींची संपूर्ण माहिती घ्या आणि एक महिन्यात त्यांचं पक्कं घर उभं करा.” मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देत सर्व सोयी-सुविधांसह आजींसाठी नवे घर उभे करून दिले. सडा वाघापूर येथे प्रचार सभेत शकुतला काकडे या आजींनी याबाबत मंत्री देसाई यांचे आभार मानले.