तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! FDA कडून 80 हजार अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त

एफडीएच्या पथकाने घटनास्थळावरून तब्बल 80,208 पेट बॉटल्सचा अवाढव्य साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या पाण्याच्या बाटल्यांची एकूण अंदाजे बाजारपेठीय किंमत 8,16,320 रुपये इतकी सांगण्यात येत आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe FDA Action: अन्न अन् औषध प्रशासनाने (FDA) धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीमध्ये छापा टाकून अशुद्ध आणि निकृष्ट दर्जाच्या संशयावरून बाटलीबंद पाण्याच्या साठ्यावर मोठी जप्ती आणली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. नरडाणा एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक T-11 येथे असलेल्या ‘शिवाय बिव्हरेजेस एलएलपी’ या आस्थापनेची एफडीएच्या विशेष पथकाने कसून पाहणी केली. या तपासणीदरम्यान मिथ्या छाप (Misbranded) आणि निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचा बडगा उचलला.

8 लाखाहून अधिक मूल्याच्या 80 हजार 208 पेट बॉटल्स जप्त
या धाडीदरम्यान एफडीएच्या पथकाने घटनास्थळावरून तब्बल 80,208 पेट बॉटल्सचा अवाढव्य साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या पाण्याच्या बाटल्यांची एकूण अंदाजे बाजारपेठीय किंमत 8,16,320 रुपये इतकी सांगण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पथकाने ‘बरेली’, ‘ग्रीष्मा एक्वा’ आणि ‘एक्वा अजंता’ या 3 प्रमुख ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. हे सर्व नमुने अधिकृत प्रयोगशाळेत (Laboratory) तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कंपनी आणि प्रशासनाविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मदतीचा मार्ग मोकळा; पंचनामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरली

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भेसळविरोधी मोहीम तीव्र
आगामी नवरात्रोत्सव आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. मिठाई, मावा आणि खवा यांसारख्या दैनंदिन अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर एफडीएची करडी नजर आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे अशाच प्रकारची कारवाई करत भेसळीचा संशय असलेला 325 किलो खवा जप्त करण्यात आला होता. या जप्त खव्याची किंमत 74,750 रुपये असून, त्या प्रकरणी 2 विविध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात आली होती.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा इशारा
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ व पेय विक्री करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तपासणी पथके अधिक सक्रिय करण्यात आली आहेत. नामांकित नसलेल्या किंवा संशयास्पद ब्रँडचे पॅकेज्ड पाणी आणि खाद्यपदार्थ खरेदी करताना नागरिकांनीही विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – अंघोळीसाठी गेले अन् परतलेच नाहीत; विषारी सापाच्या दंशाने जवानाचा दुर्दैवी अंत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version