नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून नागपूर पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यंदा पहिल्यांदाच सर्वाधिक पदके घोषित करण्यात येणार आहेत. यावेळी नागपूरमधील पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केली जातील.
नागपुरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकूण पाच राष्ट्रपती पोलीस पदके आणि पोलीस महासंचालकांची 26 पदके जाहीर केली आहेत. यादरम्यान दीर्घकाळाची गुणवत्तापूर्ण सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पदकांची घोषणा केली जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील 1 हजार 57 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 82 जणांचा यात समावेश आहे.
यामध्ये गुन्हे शाखेचे एसीपी वैभव जाधव, डॉ. दिगंबर प्रधान, प्रशांत कुलकर्णी आणि अरुण आत्राम आणि प्रदीप चौगावकर यांचा समावेश करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव केला जाणार आहे. तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील डीवायएसपी प्रशांत कुलकर्णी आणि गडचिरोलीत कार्यरत अरुण आत्राम यांना देखील राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत संबंधितांच्या नावांसमोर त्यांचे पद नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रपती पदकांच्या यादीत नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या स्तरांवरील पोलिसांचा समावेश झाल्याने शहराच्या पोलीस यंत्रणेतील गुणवत्तापूर्ण सेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत नागपूर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यालाही हा सन्मान मिळाला आहे.