महाराष्ट्र: राज्यातील हवामान पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून, कधी कडक ऊन, कधी मुसळधार पाऊस आणि कधी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यंदाची उन्हाळी हंगाम सुरुवातीपासूनच अनिश्चिततेने भरलेली आहे. होळीच्या सणानंतर उष्णता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात मात्र उलटच घडले. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. यामुळे उभी पिकं जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Today's Horoscope: कसा असेल तुमच्यासाठी आजचा गुरुवार, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
राज्यातील काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असतानाही पावसाने अचानक हजेरी लावल्याने हवामान अधिकच अस्थिर झाले आहे. यामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. एकीकडे दाट ऊन आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांनी दैनंदिन जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. अशा हवामानामुळे आजारांचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यभरात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळात वादळी वाऱ्यांचा जोर अधिक असेल. शेतकऱ्यांना या काळात योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीक संरक्षणासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज असून शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
असे असताना, हवामानात होणारे सततचे बदल ही जागतिक हवामान बदलाची लक्षणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना, हवामान अनुकूल शेती आणि शाश्वत धोरणांची अंमलबजावणी हाच यावर एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य शासनाने देखील या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांच्या किंवा अस्थिर संरचनांच्या खाली थांबू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाचे हे संकट केव्हा ओसरते आणि शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी राज्यावर नैसर्गिक संकटाचे सावट असून, पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असतील.