महाराष्ट्र : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, राज्यातील अनेक भागांत पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जुन्नर, बीड, कोकण आणि इतर भागांत शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडले आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यभर अतिवृष्टीचा इशारा दिला असून, संपूर्ण राज्याला आज ऑरेंज अलर्ट तर कोकण किनारपट्टीसाठी उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यात टोमॅटो, मिरची, केळी यांचे नुकसान
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः टोमॅटो, मिरची आणि केळी या नाजूक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात आधीच दर घसरलेले असताना या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी करत आहेत.
बीड जिल्ह्यात फळबागा उद्ध्वस्त
बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर कायम आहे. यामुळे विशेषतः फळबागांना मोठा फटका बसला आहे. आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे एका शेतकऱ्याने दोन एकरवर डाळिंबाची बाग फुलवली होती. निसर्गाच्या कोपापासून संरक्षणासाठी त्याने बागेवर कॉटनचे अच्छादन केले होते, मात्र अवकाळी पावसाने त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले. पुढील महिन्यात या डाळिंबाची विक्री होऊन 10-15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता तो मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
हवामान खात्याचा इशारा: पुढील तीन दिवस सतर्कता बाळगा
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढत असून, हवामान विभागाने राज्यभर ऑरेंज अलर्ट तर कोकणासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य व आपत्कालीन उपाययोजना सुरु असून, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांचे काम देखील वेगाने सुरू आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान तर होतेच, पण शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यही ढासळते. त्यामुळे शासनाने त्वरित आर्थिक मदतीसह दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज आहे.