महाराष्ट्र: महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्याच्या हवामानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रणालीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या 24 तासांत काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरासह परिसरात मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. दिवसभर कडक ऊन असताना रात्री अचानक पावसाने जोर धरल्याने काही ठिकाणी घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील दाजीपूर-फोंडाघाट परिसरातही अचानक तुफान सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. विशेषतः काढणीला आलेल्या कडधान्य पिकांवर या पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यात पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागले आणि त्यानंतर अवकाळी पावसाने जोर धरला. चणा, तूर, मुग, उडीद यांसारख्या पिकांवर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र काही भागांत उन्हाळी भात पिकाला या पावसाचा फायदा होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यांसह इतर भागांत सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज आहे.ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या उकाडा आणि रात्री पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. हवामानातील या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.