Unseasonal Rain Maharashtra: अवकाळी पावसाचे तांडव! राज्यात गारपिटीने शेती उद्ध्वस्त; कांदा, आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत अनेक जिल्ह्यांत गारपीट झाली असून कांदा आंबा द्राक्ष यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

Unseasonal Rain Maharashtra: अवकाळी पावसाचे तांडव! राज्यात गारपिटीने शेती उद्ध्वस्त; कांदा, आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

Unseasonal Rain Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. काही ठिकाणी नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस घातक ठरत आहे.

आंबेगाव तालुक्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखगणाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कांद्याच्या पाथ तुटल्या असून गारांच्या तडाख्याने कांद्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

सांगोला तालुक्यात आंबा, द्राक्ष बागांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत आंबा पिकासह द्राक्ष आणि डाळिंब बागांचे मोठे नुकसान केले आहे. या अनपेक्षित पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

बीड जिल्ह्यात गारपीट; बाजरी व भाजीपाला पिकांचे नुकसान

बीड जिल्ह्यात एक दिवस विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार पुनरागमन केले. गेवराईसह अनेक भागांत गारपीट झाली असून उन्हाळी बाजरी, भाजीपाला आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मेहनतीने उभी केलेली पिके अक्षरशः आडवी पडली आहेत, त्यामुळे शेतकरी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा वर्षाव

पिंपरी-चिंचवड शहरातही अवकाळी पावसाने हजेरी लावत गारांचा वर्षाव झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. काही ठिकाणी लोकांनी गारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्याचेही पाहायला मिळाले.

सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा तडाखा

सातारा जिल्ह्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि खंडाळा परिसरात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुसळधार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

बारामतीत गारवा, पण शेतकऱ्यांची चिंता वाढली

बारामती तालुक्यात अचानक 15 ते 20 मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र द्राक्ष आणि केळी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

साक्री तालुक्यात पुन्हा गारपीट

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सलग दुसऱ्यांदा गारपीटीचा तडाखा बसला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीनंतर आता पुन्हा गारपीट झाल्याने उर्वरित पिकांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सांगलीत बळीराजा हवालदिल

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घरनिकी गावात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंब, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुक्यात काढणीच्या पिकांचे नुकसान

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही अवकाळी पावसामुळे गहू, कांदा आणि कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेली पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कराडमध्ये गारांचा पाऊस; आंबा व ज्वारीला फटका

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उंडाळे आणि ओंड परिसरात गारांचा पाऊस झाला. या गारपिटीमुळे आंबा आणि ज्वारी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके काही मिनिटांच्या पावसात उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पुढील काही दिवस हवामान कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकरी आणि नागरिक दोघेही चिंतेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number