Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यानंतर आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी रात्रीपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब होऊन आर्द्रता वाढली आहे.
24 फेब्रुवारीला 'या' जिल्ह्यांत बरसणार सरी
यापूर्वी 23 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती, आता हा प्रभाव मंगळवारीही कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी (24 फेब्रुवारी) राज्याच्या विविध भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल. खालील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे:
मराठवाडा व विदर्भ: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर आणि गडचिरोली.
पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर आणि आसपासचा परिसर.
पाऊस का पडतोय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तसेच स्थानिक तापमानात झालेल्या वाढीमुळे ढगांची निर्मिती होत आहे. या 'कन्व्हेक्टिव्ह' प्रक्रियेमुळे ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर अवकाळी पाऊस कोसळत आहे.
हेही वाचा - Rohit Pawar On Black Box :'ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे, किती जळालाय हे मला माहित', अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांकडून खळबळजनक दावा
शेतीकामांना फटका: पिकांच्या नुकसानीची भीती
हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सध्या अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी पावसाने हजेरी लावल्यास गहू, कांदा, हरभरा आणि फळबागांना मोठा फटका बसू शकतो. तसेच काढणीला आलेला गहू आडवा पडण्याची किंवा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.