मुंबई: 1 जुलै 2025 पासून सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक नवे नियम लागू होणार आहेत. यात UPI पेमेंट सिस्टम, तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंग, नवीन PAN कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे, GST रिटर्न फाइलिंगचे नियम आणि क्रेडिट कार्ड फीमध्ये होणारे बदल यांचा समावेश आहे. या नियमांमुळे आर्थिक व्यवहार आणि प्रवास अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल, पण यासाठी नागरिकांनी स्वतःला वेळेत अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य
1 जुलैपासून नवीन PAN कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड अनिवार्य असेल. आतापर्यंत ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसे होते. परंतु केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नव्या नियमांनुसार, आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतरच पॅन कार्ड मिळणार आहे.
UPI चार्जबॅक नियमांमध्ये बदल
UPI वापरकर्त्यांसाठी 1 जुलैपासून नवे चार्जबॅक नियम लागू होतील. आतापर्यंत जर चार्जबॅक रिक्वेस्ट नाकारली गेली तर बँकेला NPCIशी संपर्क साधावा लागायचा. मात्र आता बँका थेट NPCIच्या परवानगीशिवाय योग्य असलेल्या प्रकरणांमध्ये चार्जबॅक स्वीकारू शकतील. यामुळे चुकीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणे आणि पैसे परत मिळवणे अधिक सोपे होईल.
तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठे बदल
IRCTC ने जाहीर केल्याप्रमाणे, 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुक करताना आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल. यासाठी वापरकर्त्याचा आधार कार्ड IRCTC खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे, जेणेकरून OTPची अडचण येणार नाही.
15 जुलैपासून तर सर्व तात्काळ तिकीट बुकिंगसाठी वन-टाईम पासवर्ड (OTP) आवश्यक असेल; मग ती बुकिंग IRCTC वेबसाइटवरून असेल वा PRS काउंटरवरून.
याशिवाय, ऑथराइज्ड एजंट्ससाठी बुकिंग टाईम लिमिट लागू करण्यात आली आहे. एजंट्सना तात्काळ बुकिंग विंडो सुरू झाल्यानंतर पहिले 30 मिनिट तिकीट बुक करण्यास मनाई असेल. AC तिकीटांसाठी ही वेळ सकाळी 10:00 ते 10:30 आणि Non-AC साठी सकाळी 11:00 ते 11:30 पर्यंत आहे.
अन्य बदल: यासोबतच, GST रिटर्न फाईलिंग प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात येणार आहेत आणि काही क्रेडिट कार्ड कंपन्यांनी त्यांच्या शुल्क संरचनेत बदल जाहीर केले आहेत.
नागरिकांनी हे सर्व बदल लक्षात घेऊन आवश्यक ती कागदपत्रं तयार ठेवणं आणि आपल्या खात्यांची माहिती अपडेट ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा व्यवहार अडथळ्यांत येऊ शकतात.