Manoj Jarange on Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र, या ऐतिहासिक टप्प्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना एक अत्यंत गंभीर आणि सूचक इशारा दिला आहे. “अजितदादांच्या जाण्यानंतर आता भोवती घिरट्या घालणाऱ्या ‘गिधाडां’पासून जपून राहा,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
‘रक्त पिणाऱ्या ढेकणांपासून लांब राहा’
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, “सुनेत्रा वहिनींना आता काटेरी वाटेवरून प्रवास करावा लागणार आहे. दादांची ताकद वेगळी होती, पण आता त्यांच्या सभोवताली काही नवी ‘गिधाडं’ आणि ‘ढेकणं’ जमा झाली आहेत. ही माणसं तुमचं राजकीय रक्त पिऊ शकतात आणि घातही करू शकतात. त्यामुळे पावलं जपून टाका.”
पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणाचा ‘सल्ला’
या कठीण प्रसंगात जरांगे यांनी पवार कुटुंबाने पुन्हा एकदा एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली. “संकटाच्या काळात शेवटी स्वतःचं कुटुंबच धावून येतं. जर पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र आलं, तर राज्याच्या राजकारणात कुणीही त्यांना रोखू शकणार नाही,” असे मत त्यांनी मांडले. तसेच, पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांनी दिलेला वारसा आणि सल्ला पाळावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
धनंजय मुंडेंवर प्रहार आणि अपघाताची चौकशी
यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही बोचरी टीका केली. “दादांचं निधन झाल्यानंतर त्याच्याभोवती, मागेमागे कोण फिरत आहे हे आपण पाहिलं. पण त्यांना काही मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस हे अजितदादांइतकेच चतुर आहेत, ते अशांना जवळ करणार नाहीत,” असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त होत असताना, “जर यात काही घातपात असेल तर त्याची सखोल चौकशी होईलच,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.