Wednesday, June 18, 2025 02:53:40 PM

ठरलं तर मग; वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार बाळाचं संगोपन

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 9 महिन्यांच्या बाळाचे संगोपन कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या, वैष्णवीचे बाळ त्याच्या आजी-आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरी आहे.

ठरलं तर मग वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार बाळाचं संगोपन

पुणे: राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केली. अशातच, वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 9 महिन्यांच्या बाळाचे संगोपन कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या, वैष्णवीचे बाळ त्यांच्या आजी-आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरी आहे. पण भविष्यात या बाळाचे काय होईल? याची काळजी सर्वांना वाटू लागली आहे. अशातच, आता वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी कुणाची असेल, यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. तर वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी वैष्णवीची आई म्हणजेच स्वाती कस्पटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे?

'पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी आणि स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती (Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे या योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल' अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली .


सम्बन्धित सामग्री