Saturday, June 14, 2025 03:28:53 AM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नोंदवले तीन साक्षीदारांचे जबाब; एक पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त

रविवारी, गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 206/25 च्या तपासात मृत वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नोंदवले तीन साक्षीदारांचे जबाब एक पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त

रोहन कदम, प्रतिनिधी, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी येथील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. रविवारी, गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 206/25 च्या तपासात मृत वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच, स्त्रीधन म्हणून वैष्णवीने दिलेली चांदीची भांडी (पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट) जप्त करण्यात आली आहे. यादरम्यान, आरोपी सुशील आणि शशांक हगवणे यांच्याकडे परवाना शश्त्र असल्यामुळे ते दोन्ही शश्त्र जप्त करण्यात आली आहेत. त्यात एक पिस्तूल आणि एक वेबले कंपनीचे रिवॉल्वर आहे. तसेच, आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी इंडिवर जप्त करण्यात आली आहे.

सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर, पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार असल्याचे सांगितले जात होते. सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरकडून लग्नासाठी 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, महिन्याला जावयाला सोन्याची अंगठी आणि वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला गेला होता. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी माहेरकडून पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीला छळ करण्यात आला. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.


सम्बन्धित सामग्री