पुणे: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते. अखेर सात दिवसांनंतर बाळाचा ताबा आजी-आजोबांकडे देण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळत नव्हता. मात्र आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे. बाळ कस्पटेंकडे सोपवण्यात आलं आहे.
हेही वाचा : राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे; वैष्णवी हगवणे यांच्या आईची मागणी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन केला आणि वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा तातडीनं शोध घ्या अशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. वैष्णवीचे बाळ तिच्या आई वडिलांकडे म्हणजेच बाळाच्या आजी-आजोबांकडे सुपूर्द करा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांना कस्पटे कुटुंबियांना भेटून ते बाळ त्यांच्या ताब्यात देण्यासाठी सूचना केल्या.
वैष्णवी हगवणे प्रकरण काय?
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून आहे. 16 मे रोजी बेडरुममध्ये गळफास घेत तिने आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या आहेत. हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणात सासरा,सासू, नवरा, दीर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 27 नोव्हेंबर 2023 मध्येही विष पिऊन वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी घेण्यात आली होती.
हेही वाचा : रोहा एमआयडीसीत 105 कोटी रुपयांचे ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर
वैष्णवीच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबियांना काय दिले?
वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळे सोनं देण्यात आले. हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्चुनर गाडी दिली. तसेच 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी दिली. एवढ्या वस्तू कमी झाल्या म्हणून अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी दिली. वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट करण्यात आला. तसेच वैष्णवीच्या माहेरी आल्यावर प्रत्येकवेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रूपये देण्यात आले. मात्र जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्याने वैष्णवीचा छळ करण्यात आला.