पिंपरी चिंचवड: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या भव्य लग्नसोहळ्याची आणि त्यामागे असलेल्या बडेजावाची चर्चा समाजात मोठ्या प्रमाणात होत आहे. 2023 मध्ये वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. पण या लग्नाच्या आडून सुरु झाला मानसिक छळ आणि वैष्णवीच्या मृत्यूने एक गंभीर प्रश्न उभा केला आहे ‘आपल्याकडील लग्न म्हणजे प्रतिष्ठेचा खेळ की मुलीच्या आयुष्याचा विनाश?’
वैष्णवीच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांनी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले. 51 तोळे सोनं, एक आलिशान फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी अशी भरमसाठ भेटवस्तू दिल्या गेल्या. सुसगाव येथील ‘सनीज वर्ल्ड’ रिसॉर्टमध्ये लाखो रुपये खर्चून भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्याची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होती.
तिच्या वडिलांनी सुमारे 10 लाख रुपयांचे रिसॉर्ट भाड्याने घेतले, स्टेजच्या सजावटीसाठी 22 लाख रुपये खर्च केले. लग्नासाठी 5,000 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि प्रत्येकी एक हजार रुपयांच्या जेवणाच्या हिशोबाने तब्बल 50 लाख रुपये केवळ भोजनावर खर्च करण्यात आले. पाहुण्यांचे सत्कार, कपडे, स्वागत समारंभ, आणि इव्हेंट मॅनेजमेंट यासाठी लाखो रुपये वेगळेच खर्च झाले.
मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच तिच्या सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणं सुरू केलं, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. चांदीची भांडी कमी असल्यामुळे सासरच्यांनी ती अपमानास्पद शब्दांत बोलावली. इतकंच नाही, तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेत सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. शेवटी या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली.
हा केवळ एक कौटुंबिक वाद नव्हता, तर समाजातील हुंड्याच्या नव्या आणि भयंकर रूपाचं दर्शन घडवणारा प्रकार आहे. प्रतिष्ठेच्या आणि बडेजावाच्या नावाखाली मुलीच्या कुटुंबावर लादले जाणारे खर्च, आणि त्यानंतरही मुलीचा होणारा छळ हे सगळं मिळून समाजासमोर आरसा धरत आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाने एक मोठा सवाल उभा केला आहे एवढा खर्च करूनही जर एका मुलीला सासरी सुरक्षितता, सन्मान आणि माया मिळत नसेल, तर असा लग्नाचा थाट उपयोगी तरी काय?