Vasai School Case : शाळेत उशिरा आल्याने काढायला लावल्या उठाबश्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षिकेला अटक

शाळा अनधिकृत असल्याचा धक्कादायक तपास निष्कर्षही समोर आला असून प्रकरणात अजून अनेक तथ्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Vasai School Case : शाळेत उशिरा आल्याने काढायला लावल्या उठाबश्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षिकेला अटक

पालघर जिल्ह्यात वसई परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक प्रकरणाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरले आहे. केवळ दहा मिनिटे उशिरा शाळेत आल्यामुळे 13 वर्षीय विद्यार्थिनीला अतिशय कठोर शिक्षा देण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाचा तपास गतीने सुरू झाल्यानंतर अखेर वालीव पोलिसांनी शिक्षिका ममता यादव या शिक्षिकेला अटक केली आहे. तिच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या नव्या बीएनएस 304 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई पश्चिमेच्या सातीवली भागातील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये शिकणारी काजल उर्फ अंशिका गौड सहावीची विद्यार्थीनी होती. 8 नोव्हेंबरच्या शनिवारी, इतर वेळीप्रमाणेच ती शाळेत गेली; परंतु त्या दिवशी तिला साधारण दहा मिनिटांचा उशीर झाला. उशिरा आल्याचा राग शिक्षिकेने इतका वाढवला की काजलसह काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करून उठाबशांची शिक्षा देण्यात आली. इतर मुलांनी काही दहा ते वीस उठाबशा केल्या, पण घाबरलेल्या काजलने शिक्षिकेच्या धाकाने अक्षरशः शंभर उठाबशा काढल्या, अशी माहिती पालकांनी दिली. ही शिक्षा तिच्यावर जीवघेणी ठरली. त्या दिवसानंतर काजलची तब्येत सतत बिघडत गेली. सुरुवातीला तिला वसईतील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्थिती गंभीर झाल्यानंतर तिला नालासोपारा येथील विजय लक्ष्मी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथेही प्रकृती सुधारली नाही.

हेही वाचा:  Academic Policy Change: शालेय अभ्यासक्रमात ‘वाणिज्य’ विषय समाविष्ट करण्याच्या ICAI च्या प्रस्तावाला शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद

अखेर 15 नोव्हेंबरला, बालदिनाच्या दिवशी, काजलला तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले, पण रात्री 11 वाजताच्या सुमारास तिचा श्वास थांबला. एवढ्या लहान वयात, शिक्षेच्या नावाखाली झालेल्या अत्याचाराने तिचे आयुष्यच संपुष्टात आले. या प्रकरणाची नोंद सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. परंतु मृत्यूभोवती वाढत गेलेली शंका आणि पालकांनी केलेले गंभीर आरोप पाहता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. तपासात शिक्षिकेच्या वागणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आणि अखेर ममता यादव यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला. आज तिला अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, काजल शिकत असलेली ही शाळा अनधिकृत असल्याचाही धक्कादायक खुलासा झाला आहे. ’शिक्षण’ या पवित्र नात्याच्या आडून विद्यार्थ्यांवर असा मनमानी अत्याचार होत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. तपास सुरू असून अनेक मुद्द्यांवर अजूनही पडदा उघडायचा आहे. काजलच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण निर्णायक ठरले? शिक्षिकेच्या कठोर शिक्षेमुळेच हा परिणाम झाला का? शाळा व्यवस्थापनाकडून अजून कोणावर कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या चौकशीतून स्पष्ट होतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, या घटनेने पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाला अस्वस्थ केले आहे.

हेही वाचा:  Bihar Politics : बिहारमध्ये नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा! कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number