पुण्यात DJला विरोध करणं पडलं महागात? विद्यानंद बापटांना टिळक रोडवर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या विरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याचा आरोप आहे. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस तपास सुरू आहे.

पुण्यात DJला विरोध करणं पडलं महागात? विद्यानंद बापटांना टिळक रोडवर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

गणेशोत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पुण्यात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बापट हे सार्वजनिक उत्सवांमध्ये DJ आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी करत आहेत. याच मुद्द्यावर ते माध्यमांशी संवाद साधत असताना काही तरुण तेथे आले. त्यांनी बापट यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर हात उचलण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण कॅमेऱ्यात झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. घटनेनंतर बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण गणेशोत्सवाच्या विरोधात नसल्याचे सांगितले. धार्मिक किंवा सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसून, केवळ मोठ्या आवाजातील DJ आणि ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या त्रासाला आपला आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मताला विरोध असेल तर चर्चेच्या माध्यमातून तो मांडला जावा, अशा भूमिकेवरही त्यांनी भर दिला.

बैठकीतील भूमिकेमुळे आले चर्चेत

काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत बापट यांनी DJ आणि कर्णकर्कश आवाजाच्या मुद्द्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या भूमिकेला काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या बैठकीतील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर बापट यांची चर्चा राज्यभर झाली.त्यानंतर त्यांनी विविध माध्यमांमधून ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. मात्र, आता याच भूमिकेमुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि उपलब्ध व्हिडीओच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मारहाणीमागील नेमके कारण आणि घटनेतील संबंधितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number