अहिल्यानगर आणि धाराशीवसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँकांनी कर्जवसुलीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान करत बँक अधिकाऱ्यांना मारहाण करून हाकलून लावण्याचे आवाहन जनेताला केले आहे.
मंगळवारी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 24 जिल्ह्यांतील 137 तालुके बाधित झाले आहेत. केवळ एकाच महिन्यातील पिकांचे नुकसान 26 लाख हेक्टरपर्यंत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे वसुलीच्या नोटिसा पाठवणाऱ्या बँकांची जबाबदारी कशी मान्य करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने बँकांना अशा सक्तीच्या वसुलीपासून रोखण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, असे मतही त्यांनी नोंदवले.
यावेळी वडेट्टीवार यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे ठोस निर्णय जाहीर करण्याची मागणी केली. पावसामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून त्यांना लवकर उभे करण्यासाठी भरीव पॅकेज आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अजूनही केंद्र सरकारकडून पाहणी पथक न आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्याचे प्रकरण केवळ एका जिल्ह्यात असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. तसेच जुन्या नोटिसा देण्यात आल्या असून कुठेही वसुली करण्याची परवानगी देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावावे, असा आग्रहही वडेट्टीवार यांनी धरला.मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही त्यांनी दिला.