मुंबई: "लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी", पण याच जीवनवाहिनीने जेव्हा सर्वसामान्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केल्या, तेव्हा उद्रेक अटळ झाला. आज सकाळी (4 मे 2026) विरार रेल्वे स्थानकावर नेमका हाच असंतोष उफाळून आला. 'एसी'च्या (AC) थंड हवेपेक्षा सर्वसामान्यांच्या पोटापाण्याची आणि वेळेवर कामावर पोहोचण्याची तळमळ अधिक तीव्र असते, याचा विसर पडलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला आज प्रवाशांच्या रोषाचा थेट सामना करावा लागला. वर्षानुवर्षे सर्वसामान्यांसाठी धावणारी विरार-चर्चगेट लोकल रेल्वेने अचानक 'वातानुकूलित' केल्याने संतापलेल्या प्रवाशांनी चक्क गाडीच रोखून धरत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला जोरदार धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने 29 एप्रिल 2026 रोजी एका परिपत्रकाद्वारे निर्णय जाहीर केला होता की, 1 मे 2026 पासून सकाळी 8 वाजून 28 मिनिटांची विरार-चर्चगेट सामान्य लोकल वातानुकूलित (AC) स्वरूपात चालवली जाईल. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी जेव्हा चाकरमानी या गाडीची वाट पाहत होते, तेव्हा हा बदल त्यांच्या पचनी पडला नाही. रोजच्या प्रवासाचा कणा असलेली ही हक्काची गाडी हिरावून घेतल्याने संतप्त प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरून ही गाडी रोखून धरली, ज्यामुळे स्थानक परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाचे शून्य नियोजन असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. विरारवरून सकाळी 8 वाजून 33 मिनिटांची आधीच एक वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध आहे. असे असताना, अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दुसरी 'एसी' लोकल चालवण्याचा अट्टहास का? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. या निर्णयामुळे सामान्य डब्यांच्या गाड्यांची संख्या कमी झाली असून, इतर गाड्यांमध्ये उसळणाऱ्या अलोट गर्दीमुळे चाकरमान्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून, दारात लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.
हेही वाचा: Tamilnadu Election Result 2026: सिनेस्टारच्या हाती जाणार राज्याची सूत्र? तमिळनाडूत 'विजयी' घोडदौड, 'TVK' 74 जागांवर आघाडीवर
वातानुकूलित गाड्यांचे गगनाला भिडलेले तिकीट दर हे सर्वसामान्य कामगार, विद्यार्थी आणि निम्न-मध्यमवर्गीय प्रवाशांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. केवळ महसूल वाढवण्याच्या हव्यासापोटी प्रशासनाने सामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला आहे. "तुम्हाला वातानुकूलित गाड्या वाढवायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे वाढवा, पण आमच्या हक्काच्या सामान्य गाड्यांचे रूपांतर करून आमच्यावर अन्याय करू नका," अशी अत्यंत रास्त आणि ठाम भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.
प्रवाशांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाले. विरार स्थानकावर 'ट्रॅक रोको' झाल्याने अनेक गाड्यांना लेटमार्क लागला आणि पुढील स्थानकांवर ताटकळत उभ्या असलेल्या हजारो प्रवाशांनाही या विस्कळीत सेवेचा नाहक फटका बसला. संतप्त प्रवाशांनी यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
सध्या रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, हा प्रश्न केवळ एका दिवसाच्या आंदोलनाचा नसून, लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत आहे. प्रवाशांच्या भावनांचा अंत न पाहता, प्रशासनाने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी 8 वाजून 28 मिनिटांची लोकल पुन्हा 'सामान्य' स्वरूपात सुरू करावी, अन्यथा हा असंतोष भविष्यात अधिक तीव्र होऊ शकतो, असा स्पष्ट इशाराच आजच्या आंदोलनातून दिला गेला आहे.
हेही वाचा: Kearalam Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसची 'लाट'! 96 जागांवर आघाडी घेत UDFची ऐतिहासिक घोडदौड, डाव्या आघाडीची सत्ता धोक्यात?