Pandharpur Wari 2025: पंढरपूरची आषाढी वारी केवळ एक चालणं नाही, तर ती श्रद्धेचा महासागर आहे. हजारो, लाखो वारकरी संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांची गाथा गात पंढरीच्या दिशेने पावले टाकतात. 'विठोबा रे माऊली, पांडुरंगा!' असा भक्तीचा निनाद दरवर्षी निघतो. पण काही जणांच्या मनात खंत आहे 'जावंसं खूप वाटतं, पण वेळ, तब्येत किंवा जबाबदाऱ्या आड येतात.' तर असा विचार मनातून काढा. कारण, तुम्ही वारीत सहभागी होऊ शकत नसाल, तरी विठोबाची कृपा तुमच्यावर होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला करावी लागेल एक छोटीशी, पण पवित्र कृती.
हेही वाचा: Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती
विठोबा घरी येतो; वारकऱ्यांच्या रूपाने
जे वारकरी पंढरपूरकडे निघालेले असतात, ते केवळ चालणारे प्रवासी नसतात. ते चालती बोलती भक्ती असतात. त्यांच्या पायांमध्ये विठोबाची ऊर्जा असते, ओठांवर त्याचं नामस्मरण असतं, आणि हृदयात निस्वार्थ भक्ती. लोकांची समजूत अशी आहे की; 'वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणांमध्ये विठोबाची कृपा असते.' म्हणूनच, जर तुम्ही वारीत सहभागी होऊ शकत नाही, तर वारीतून येणाऱ्या एखाद्या वारकऱ्याचा चरणस्पर्श घ्या. त्याला पाणी द्या. त्याच्या तोंडून 'राम कृष्ण हरि' ऐका. कारण तेव्हा तुमच्या घरी येतो तो विठोबा थकल्याच्या पायांमध्ये, आणि ओठांवरील अभंगात.
केवळ शरीर नव्हे, मनानंही वारी करता येते
वारीत चालणं हे शरीराचं तप आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मनाचं शुद्धीकरण. जर तुम्ही घरात बसूनही वारकऱ्यांचं स्वागत करता, त्यांची सेवा करता, त्यांच्याबद्दल आदर बाळगता तर समजा तुम्हीही वारीचं पुण्य मिळवताय.वारी म्हणजे अंत:करणाची यात्रा.कधी कधी शरीर पंढरपूरला पोहोचू शकत नाही, पण मन निघालं की तेही पुरेसं असतं. संत नामदेवांनी एकदा म्हटलं होतं, 'विठोबा मनात असेल, तर देवदर्शन घरबसल्या होतं.'
हेही वाचा: Pandharpur Wari Palkhi 2025: तुम्हाला पूजाविधींबाबत 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या योग्य विधी आणि पालखीचे वेळापत्रक
'वारीत जायला जमलं नाही तरी चिंता नका करू. विठोबा दूर नाही, तो तुम्हाला भेटतो; एका थकलेल्या वारकऱ्याच्या पायांतून, त्याच्या ओठांवरच्या नामातून आणि तुमच्या मनातील श्रद्धेतून.' यावर्षी जर वारीत जाता आलं नाही, तर वारकऱ्यांचं स्वागत करा, त्यांच्याशी दोन शब्द बोलून त्यांच्या अनुभवातून विठोबाला अनुभवा. आणि शेवटी, त्यांच्या पायांवर डोकं ठेवून एकच मागणी करा 'विठोबा, तुझा दूत माझ्या घरी आला... आता तुझी कृपाही येवो'