Saturday, June 14, 2025 04:45:18 AM

गोदावरी नदी कोरडी पडल्याने शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई; मराठवाड्यात 377 गावांमध्ये 433 टँकरने पाणीपुरवठा सुरु

मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.

गोदावरी नदी कोरडी पडल्याने शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई मराठवाड्यात 377 गावांमध्ये 433 टँकरने पाणीपुरवठा सुरु

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर मराठवाड्यात सध्या 377 गावांमध्ये 433 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर मराठवाड्यातून वाहणारी गोदावरी नदी कोरडी काठ पडल्याने शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील जलसाठा सरासरी 32 टक्क्यांच्या खाली आहे. लघुप्रकल्पात तर केवळ 21 टक्केच पाणीसाठा आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी कोरडी ठाक पडल्याने गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोदावरी नदीची भीषण दाहकता टीपलेली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमधून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे गोदाकाठची गावं ही गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी कोरडी ठाक पडली आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव येथे पाणीटंचाई गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी पावसाळ्यात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे हिवाळ्यातच नद्या, ओढे, नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले होते. पाझर तलाव, लघु तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. तर काहींमध्ये शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठले. यामुळे जलसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना थेट पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या एअर व्हाल पाणी भरण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा : आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

मराठवाड्यात नागरिकांना पाणी वेळेवर मिळण्यासाठी सरकारकडून हजारो कोटी रुपये पाणी योजनेवर खर्च केले जात असतानाही आजच्या स्थितीला नागरिकांना 60 ते 70 रुपये ड्रम प्रमाणे पाणी विकत घेण्याची वेळ ओढवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून भीषण पाणी टंचाई असते मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासन या गंभीर समस्येकडे दुलर्क्ष करत असल्याने पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. पाणीटंचाईकडे सरकार किती गंभीर्याने लक्ष देईल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 
मराठवाड्यात सध्या सुरू असलेली ट्रॅकरची संख्या 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 177 गावे आणि 31 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात 70 गावे आणि 19 वाड्यांना 120 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात 6 गावे आणि 21 वाड्यांना 18 टँकर सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात एका गावात एक टँकर आणि हिंगोलीतील दोन वाड्यांमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात 18 गावे आणि 23 वाड्यांमध्ये 26 टँकर आहेत. तर लातूर जिल्ह्यात 2 गावे व 3 वाड्यांमध्ये 3 तर धाराशिव जिल्ह्यातील 4 गावांमध्ये 7 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत.
मराठवाड्यात 755 विहिरींचे अधिग्रहण
प्रशासनाने 755 खासगी विहिरींचे अधिग्रहण केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 185, जालन्यात 147, परभणीत 19, हिंगोलीत 68, नांदेडमध्ये 168, बीडमध्ये 65, लातूरात 44 आणि धाराशिव जिल्ह्यात 59 विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी 202 गावांतील 239 विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त 422 गावांतील 516 खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.


सम्बन्धित सामग्री