विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 349 टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता. अशातच, 23 मे पर्यंत टँकरांची संख्या 573 पर्यंत गेली आहे. तसेच, 23 मे अखेरपर्यंत मराठवाड्यात 370 गावे आणि 149 वाड्यांसाठी 573 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरवर्षी मराठवाड्यात डिसेंबरपासून अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र टंचाई कमी झाली नाही.
जिल्हा आणि टँकर:
1: छत्रपती संभाजीनगर - 273
2: जालना - 180
3: नांदेड - 57
4: धाराशिव - 16
5: परभणी - 07
6: हिंगोली - 02
7: लातूर - 03