राज्यात हिवाळ्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून थंडीचा कडाका नागरिकांना चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सकाळ-संध्याकाळ गारठा वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, ठाण्यासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तावली जात आहे. अशातच पुण्यातील काही भागात 9 ते 10 अंश किमान तापमान असल्याचे दिसून येत आहे. तसेच उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून पश्चिम महाराष्ट्रात हवामानात उलटापालट झाली आहे.
जालना, बीड, लातूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सियस इतके आहे. धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 7.7 अंश सेल्सिअस तापमान होते. भंडारा, गोदिंया आणि मालेगाव येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच मुंबईसह ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. यासोबतच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांतही धुक्याचे वातावरण दिसून आलं.