गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातलं होत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मार्च महिन्यापासून राज्याला झोडपून काढलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. अवकाळीचा धोका टळला असून उन्हाचा पारा चढला आहे. राज्यात 2 ते 3 दिवसांनंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून पारा 2 ते 4 अंशांनी वाढेल. मुंबईसह कोकणात कमाल तापमानाचा पारा 31-35 अंशांच्या दरम्यान राहणार असून दमट हवामानामुळे अस्वस्थता जाणवू शकते. तसेच पुढील काही दिवसांत तापमान 2 ते 3 अंशांनी वाढू शकते. तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 32 ते 38 अंशांच्या दरम्यान राहणार असून पुणे, सोलापूरसह सांगली येथे हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्रात आज कमाल तापमान 38 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज पारा 35-39 अंशांच्या दरम्यान राहील.
हेही वाचा- Monsoon 2026 Prediction: बळीराजाचं टेन्शन वाढलं! मान्सूनवर 'एल निनो'चं गडद सावट; यंदा पाऊस सरासरीपेक्षा...
अवकाळी पावसानंतर आता उन्हाचे चटके
अवकाळी पावसाचे संकट संपताच नागपूरात आणि विदर्भातम सूर्य आग ओकण्यास तयार झाला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा 45 पार जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आठवडाभर विदर्भात ऊन पावसाचा खेळ सुरू होता. आता आकाश निरभ्र होत असून आजपासून सूर्याचा पारा वाढणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच आवश्यक काम असल्यासच दुपारी 12 ते 4 बाहेर निघावे अन्यथा दुपारी उन्हात जाणे टाळावे असा सल्ला देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरावरील अवकाळी पावसाचे ढग ओसरल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वेगाने वाढू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचे किमान तापमान 20.4, तर कमाल तापमान 35.8 अंश सेल्सियस नोंदवले गेले. गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पारा 35 अंशांच्या घरात असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात यात आणखी 3 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात 7 ते 12 एप्रिल या कालावधीत कमाल तापमान 36 ते 39 अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी किमान तापमान 22 अंशांच्या पार गेले होते. त्यानंतर त्यात काही अंशी घट झाली असली तरी आता पुन्हा किमान तापमान 21 अंशांपर्यंत पोहोचणार आहे. 12 एप्रिलपर्यंत शहराचा पारा 3९ अंशांवर जाण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा- Gold Price Increased: युद्धविरामानंतर सोन्याच्या किमतीत मोठी उलथापालथ; जागतिक सराफा बाजारात सोन्याचे दर तब्बल...
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे द्राक्षांची प्रतवारी घसरली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे प्रतवारी घसरल्याने द्राक्षांच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसरण झाली. पूर्वी 75 रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या द्राक्षांना सध्या अवघा 40 रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रतवारी घसरल्यामुळे निर्यात व बाजारपेठेतील मागणी कमी झाली असून एकरी अंदाजे 1 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.