अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी हर्णेच्या पुढे त्याचा प्रवास थांबण्याची किंवा मंदावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप उष्णतेपासून कोणताही मोठा दिलासा मिळालेला नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती जाणवू शकते.
तसेच महामुंबई परिसरात 16 जूनपर्यंत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या 12 जूनपर्यंतच्या दैनंदिन अद्ययावत अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
या 13 जूनच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशाचा काही भाग तसेच दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. त्याऐवजी महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यात मान्सूनच्या आगमनाबाबतची अनिश्चितता वाढली असून हवामानाबाबत चिंता अधिक गडद झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्याच्या अंतर्भागातही किमान तापमान सरासरीपेक्षा चढे आहे. कमाल तापमान आणि सरासरी तापमानातील फरक खूप मोठा आहे.