राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याकडून मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भात या भागांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील तीन तास राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याच्या इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला बळ मिळत असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणपट्ट्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तावण्यात आला आहे. यावेळी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 20 ते 22 जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. यावेळी मुंबईसह उपनगराच ताशी 50 ते 60 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे.
तसेच 23 जुलैलाही मुंबई व ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याने लावला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, समुद्रकिनारी जाणे टाळावे, घाट परिसरात प्रवास करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. त्याचसोबत वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
इतर भागांत काय स्थिती?
अमरावतीत गेल्या आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने शहरात जोरदार पुनरागमन केले आहे. या धुवाधार पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुकू लागलेल्या पिकांना खऱ्या अर्थाने नव संजीवनी मिळणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत असून पावसामुळे खरीप हंगामातील कोमेजलेल्या पिकांसाठी संजीवनी मिळाली आहे. यावेळी पुढील दोन दिवस नागपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यावेळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे.
तसेच नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार ते गुरुवार दरम्यान नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आदी घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.