आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. तसेच गेल्या महिनाभरापासून चातकापरी पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आज सुखावणारी सकाळ उजाडली आहे. तसेच मे अखेर मान्सूनचे वेध लागले असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सध्या राज्यात दुहेरी हवामान जाणवत आहे. बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण, सोसाट्याचे वारे आणि वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेची लाट कायम असली तरी आज हलक्या पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे.
यावेळी मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, विलेपार्ले, सांताक्रुज याठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि नवी मुंबई याठिकाणी देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
तर विदर्भात भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरत अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी लावली आहे. नवतपा सुरू असून गोंदिया जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोचलेले आहे. अशातच आज गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, धुळे, नंदूरबार, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात उकडत्या गर्मीनंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे धान भिजल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.