मुंबई आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज आज मध्यम ते अती मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून हवामान खात्याने आज मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. आज दिवसभर पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा असून पालघरच्या पूर्वपट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे.
कोकणात आज रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे सर्वत्र पाणी पाणी झालं असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणांतील पाणी साठा २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सखल भागात पाणी साचले असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सध्या येल्लो अलर्ट जारी केला असून उद्यासाठी ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाने जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी देवगड दोडामार्ग मालवण यासह तालुक्यात अन्य ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळतो सध्या शेतीसाठी उपयुक्त पाऊस असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतो आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्याने जनजीवनावर परिणाम झाला. चिपळूण तालुक्यात रात्री दमदार पाऊस झाल्याने शहरातील काही सखल भागांत पाणी साचले. आईस फॅक्टरी परिसर आणि भैरी मंदिर रोड येथे गटारे तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि जिल्ह्यामध्ये सर्वत्र आज पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून सुटका मिळाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसून आला. या पावसामुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग येणार असून धान पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.