Sunday, May 10, 2026 07:35:49 PM

LPG Consumers In India: LPG वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत सर्वाधिक ग्राहक

या संकटाच्या काळात देशातील एलपीजी ग्राहकांची नेमकी संख्या आणि सरकारी योजनांचा प्रभाव समजून घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

lpg consumers in india lpg वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत सर्वाधिक ग्राहक

LPG Consumers In India: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचे थेट चटके भारतीय स्वयंपाकघरांना बसत आहेत. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद झाल्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, नागरिक आता चुली किंवा इंडक्शन कुकटॉपकडे वळू लागले आहेत. या संकटाच्या काळात देशातील एलपीजी ग्राहकांची नेमकी संख्या आणि सरकारी योजनांचा प्रभाव समजून घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

एलपीजी वापरात उत्तर प्रदेश देशात अव्वल
भारतातील एकूण घरगुती गॅस ग्राहकांपैकी सर्वाधिक ग्राहक उत्तर प्रदेशात आहेत. एकट्या या राज्यात सुमारे 4.87 कोटी एलपीजी वापरकर्ते असून, हे प्रमाण देशाच्या एकूण ग्राहकांच्या 15 टक्के आहे. प्रचंड लोकसंख्या आणि ग्रामीण भागात झालेला गॅसचा विस्तार यामुळे उत्तर प्रदेश या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील एकूण सक्रिय ग्राहक आणि राज्यानुसार आकडेवारी
गेल्या 10 वर्षात पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे भारतात एलपीजी नेटवर्कचा मोठा विस्तार झाला आहे. सध्या देशात सुमारे 33.37 ते 34 कोटी सक्रिय घरगुती ग्राहक आहेत. उत्तर प्रदेशनंतर इतर राज्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

महाराष्ट्र: सुमारे 3.02 कोटी ग्राहक.
पश्चिम बंगाल: सुमारे 2.72 कोटी ग्राहक.
तमिळनाडू: सुमारे 2.4 कोटी ग्राहक.
बिहार: सुमारे 2.33 कोटी ग्राहक.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा (PMUY) प्रभाव
गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'पंतप्रधान उज्ज्वला योजने'ने देशात मोठी क्रांती घडवली आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत संपूर्ण भारतात एकूण 10.56 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Free Gas Offer: LPG टंचाईवर तोडगा; ग्राहकांना PNG कडे वळवण्यासाठी कंपन्यांकडून खास ऑफर्स

उज्ज्वला योजनेचे सर्वाधिक लाभार्थी कुठे?
या योजनेचा लाभ घेण्यातही उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. राज्यानुसार लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे:
उत्तर प्रदेश: 1.88 कोटी कुटुंबे.
पश्चिम बंगाल: 1.24 कोटी कुटुंबे.
बिहार: 1.18 कोटी कुटुंबे.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, उत्तर भारतासह महाराष्ट्रातही गॅसची मागणी मोठी आहे, म्हणूनच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेली टंचाई या राज्यांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
 


सम्बन्धित सामग्री