नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खरातसोबतच अनेक नेते आणि बडे अधिकारी हे देखील गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले. अशातच खरातसह त्याची पत्नी देखील पोलिसांच्या रडारवर आली आहे. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलिसांत अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशोक खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होण्याआधीच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक पोलिस आणि SIT च्या पथकातील महिला अधिकारी आणि एक पुरुष पोलिस अधिकारी खरात याच्या तृप्तबाला या बंगल्यात दाखल झाले होते. कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक नाशिकच्या अशोक खरातच्या घरी गेले असता कल्पना खरात घरात नव्हती. कल्पना खरात फरार झाल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हर्षवर्धनची SIT पथकाकडून तब्बल एक तास चौकशी करण्यात आली. अशातच कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.