Raj Thackeray Post: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या एका सडेतोड पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सावरकरांच्या विचारांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार निशाणा साधत, सध्याच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहावरही कठोर भाष्य केले आहे.
सावरकरांच्या विचारांचा खरा अर्थ समजला का?
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सावरकरांविषयीची भूमिका मांडताना म्हटले की, सावरकर हे केवळ हिंदुत्ववादी नेते नव्हते, तर ते विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध विचारांचे पुरस्कर्ते आणि समाजसुधारक होते. त्यांच्या विचारांची व्याप्ती मोठी असतानाही अनेकांनी त्यांना संकुचित चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सावरकरांच्या नावाचा वापर करून मतांचे राजकारण करणाऱ्यांना खरोखरच त्यांचे विचार समजले आहेत का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणतीही गोष्ट अंधपणे स्वीकारण्याऐवजी तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहण्याचा सावरकरांचा दृष्टिकोन आज हरवत चालल्याचे त्यांनी नमूद केले.
भोंदूगिरीवर टीका
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील अफवा, चुकीची माहिती आणि अंधश्रद्धांवरही जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट पडताळणी न करता खरी मानण्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच काही राजकीय नेते भोंदू बाबांच्या मागे लागल्याचे चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्राची वैचारिक परंपरा आणि प्रगत संस्कृती विसरून समाजाला फक्त उत्सव, डीजे आणि धार्मिक ध्रुवीकरणात गुंतवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सावरकरांनी धर्मातील चुकीच्या प्रथा आणि विसंगतींवर उघडपणे टीका केली होती, मात्र आज त्यांच्या नावावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
जातीयवादावरही साधला निशाणा
सावरकरांनी जातिभेदाच्या विरोधात भूमिका घेतली होती, याची आठवण करून देत राज ठाकरे यांनी सध्याच्या समाजातील वाढत्या जातीय तणावावरही भाष्य केले. जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण होत असून त्याला सत्ताधाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत… pic.twitter.com/6kmRO5jthI — Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2026
“सावरकरांना खरी श्रद्धांजली म्हणजे…”
आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राने स्वतःची वैचारिक परंपरा ओळखून तर्कशुद्ध विचार स्वीकारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कोणतीही गोष्ट अंधपणे न मानता विचारपूर्वक तपासणे आणि समाजातील चांगल्या मूल्यांचा स्वीकार करणे, हीच सावरकरांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.