नवरा-बायकोच्या नात्याचा पाया विश्वासावर उभा असतो. एकमेकांप्रती असलेला विश्वास, समजूतदारपणा आणि संवाद यामुळेच हे नातं अधिक घट्ट होतं. मात्र जेव्हा या नात्यात संशयाची ठिणगी पडते, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. अशीच एक घटना नाशिक रोड परिसरातून समोर आली आहे.
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर तब्बल 8 ते 10 वार केले. यावेळी मान, पाठ आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला केल्यामुळे महिला गंभीर झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी पतीने पळ काढला असून संशयित आरोपी हनुमान हिंगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वैशाली आपली आई मिना काशिराम बलखंडे, मुलगी स्वरा आणि हनुमान त्र्यंबक हिंगे यांच्यासह एकत्रित राहत होती. वैशाली ही स्पामध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. दोन महिन्यांपूर्वीच वैशाली आणि हनुमान यांचे दुसरे लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासूनच संशयित पती हनुमान हा वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता.
यावरून दोघांमध्ये घरात नेहमीच वाद होत होते. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास वैशालीने आईला फोन करून, "पती हनुमान याने माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. तू तातडीने घरी ये." असं सांगितले असताना मिना यांनी तात्काळ घरात धाव घेतली. यावेळी वैशाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
वैशालीने पति हनुमान हिंगेसोबत परभणीला जाण्यास नकार दिला होता. यावर "तू माझ्यासोबत कामासाठी परभणीला चल, तू परभणीला न येण्याचे कारण मला चांगलेच माहिती आहे. तू येत नाहीस तर मी तुला आज संपवूनच टाकतो." असा तगादा लावत तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
रक्तबंबाळ झालेल्या वैशालीला आईने परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पीडित महिलेच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.