Harshwardhan Sapkal: टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. 'माझा पुतळा जाळण्यापेक्षा, शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सावरकरांचे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुतळे भाजप जाळणार का?' असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
वादाची पार्श्वभूमी आणि सपकाळ यांचे स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी टिपू सुलतान यांना शिवरायांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले होते, ज्यावरून भाजपने राज्यभर आंदोलने छेडली. यावर स्पष्टीकरण देताना सपकाळ म्हणाले की, टिपू सुलतान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 'स्वराज्य' आणि 'शौर्याचा' आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असा त्यांच्या बोलण्याचा मूळ अर्थ होता. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मांडलेली भूमिका भाजपने खोडसाळपणे आणि अर्धवट प्रसिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. "शिवरायांचा पराक्रम अद्वितीय असून तो आमच्या संविधानाची प्रेरणा आहे, हे सांगायला मला भाजपच्या शिकवणीची गरज नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला.
भाजपच्या 'दुटप्पी' राजकारणावर ओढले ताशेरे
हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या राजकीय सोयीनुसार बदलणाऱ्या भूमिकेवर कडक टीका केली. महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने टिपू सुलतान यांचे फोटो वापरले होते, मग आताच त्यांना आक्षेप का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, अमरावतीमध्ये एमआयएमची मते घेणे असो किंवा चंद्रपूरमध्ये त्यांच्या मदतीने महापौर बसवणे असो; महाराष्ट्रात 21 ठिकाणी भाजपची एमआयएमशी छुपी युती असल्याचे सत्य आता लपून राहिलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - Harshawardhan Sapkal: पुण्यात राजकीय रणकंदन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले, दगडफेकीत कार्यकर्ते जखमी
मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न
दिल्लीतील महत्त्वाच्या फायलींमध्ये दडलेले सत्य आणि महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धर्माचे राजकारण करत असल्याचे सपकाळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "मी त्यांना 'जल्लाद' किंवा 'दरिंदा' म्हटले तेव्हा त्यांनी मला ओळखले नाही, पण आता मात्र ते माझ्यावर गरळ ओकत आहेत. हा केवळ पराचा कावळा करण्याचा प्रकार आहे."
संविधानावर घाला घालण्याचा डाव
महापुरुषांच्या छायाचित्रांवरून वाद निर्माण करणे, हा भाजपचा संविधान संपवण्याचा एक मोठा कट असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. भाजप हा 'माफीवीरांचा' पक्ष असल्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीसाठी माफीची मागणी करत सुटतात, असा टोला लगावत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.