Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये पोलीस अधिकारी म्हणून दणदणीत कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेले महाराष्ट्राचे सुपुत्र IPS शिवदीप लांडे यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत थेट राजकीय रणांगणात उतरले आहेत. जमालपूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात असून या लढतीकडे बिहारसह महाराष्ट्राचंही विशेष लक्ष आहे. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीचे नरेंद्र कुमार तांती आणि जदयूचे नचिकेता मंडल हे उमेदवार उभे आहेत. निवडणुकीपूर्वी लांडे यांनी ‘हिंद सेना’ नावाची संघटना स्थापन केली होती. मात्र या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. आज मतमोजणी होत असल्याने जमालपूरमधील निकाल काय येतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लांडे यांचा प्रवास
सुमारे 18 वर्षे बिहार पोलिस दलात काम करताना शिवदीप लांडे यांनी धाडसी कारवाईंसह अनेक गुन्हेगारी रॅकेट्स मोडून काढली. 2006 बॅचचे अधिकारी असलेले लांडे हे नुकतेच बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची कर्तव्यनिष्ठा, निर्भीड निर्णय आणि कठोर अंमलबजावणी यामुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले.
विजय शिवतारे यांचे जावई
लांडे यांचे महाराष्ट्राशीही जवळचे नाते आहे. ते राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. काही काळ मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकात काम करताना त्यांनी ड्रग्सविरोधात मोठ्या कारवाया केल्या. तसेच, गुन्हे शाखेत उपायुक्त असताना अनेक गाजलेली प्रकरणे उकलण्यासाठी ते चर्चेत आले. मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
दरम्यान, मुंगेरमध्ये 2009 ते 2011 दरम्यान ते एएसपी म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी गुन्हेगारीवर कडक कारवाई करत स्थानिक पातळीवर मोठा प्रभाव निर्माण केला. त्यामुळे मुंगेर आणि आसपासच्या भागात त्यांचा समर्थक वर्ग आजही मजबूत आहे. याच लोकाधारावर ते बिहारलाच आपली ‘कर्मभूमी’ मानून निवडणुकीत उतरले आहेत.
संपत्ती आणि शपथपत्रातील माहिती
शिवदीप लांडे यांच्या शपथपत्रात नमूद केलेल्या आर्थिक माहितीनुसार
त्यांच्या बँक खात्यांमध्ये 20.33 लाख रुपये आहेत
तर विविध गुंतवणुकींसह त्यांची एकूण मालमत्ता 6.65 कोटी रुपये आहे.
त्यांच्यावर जवळपास अडीच कोटी रुपयांचे गृहकर्ज आहे
तसेच त्यांच्याकडे 20 लाखांची कार असल्याचे उल्लेख आहे
त्यांच्या पत्नीकडे 100 ग्रॅम सोने असून त्या व्यावसायिक असल्याचे नोंदवले आहे.
निकालांवर सर्वांचे लक्ष
पोलिस सेवेतून थेट राजकारणात प्रवेश करणारे शिवदीप लांडे हे जमालपूरमध्ये किती प्रभाव पाडतात, याचे चित्र आजच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. त्यांच्या प्रवेशामुळे हा मतदारसंघ विशेष चर्चेत आला असून निकालाची प्रतीक्षा अधिकच उत्सुकतेची बनली आहे.