अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरून होती. यावर पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. एकीकडे या विलीनीकरणाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील दोन नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांना जोर धरला आहे.
भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या आशयाचा आरोप शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “आमचीच शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असून, आम्हाला जनतेचा खरा कौल मिळाला आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार आम्ही एकदा नाही तर दोनदा यशस्वीपणे स्थापन केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता शिवसेना, ‘धनुष्यबाण’ चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद देईल.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का? विचरलं असता या मुद्यावर त्यांनी भाष्य करणे टाळले.