नाशिक: नाशिकमधील इंदिरानगर परिसरात असलेल्या बोगद्या जवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुण आणि त्याच्या मैत्रिणीवर झाडीत बसून दारू पिणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना केवळ अमानुष मारहाणीपुरती मर्यादित नाही, तर नाशिकमधील वाढत्या असुरक्षिततेचे आणि पोलिसांच्या दक्षतेच्या अभावाचे एक भयावह उदाहरण आहे.
विशेष म्हणजे, ज्या भागात ही घटना घडली, त्या भागात यापूर्वीही मद्यपी टोळ्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र, सामान्य नाशिककरांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, 'शहरात कायद्याचा धाक शिल्लक आहे का?' दरम्यान, शहरातील अनेक बिअर बार, वाईन शॉप आणि सावलीच्या जागांमुळे इंदिरानगरसारख्या भागात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे स्पष्ट होत आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा घटनांची पुनरावृत्ती अटळ आहे.