छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एका अत्यंत धक्कादायक घटनेत, 50 वर्षीय महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी (28 जून) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात दोन महिन्यांपासून वास्तव्याला होत्या.
घटनेच्या दिवशी, मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी पूजेसाठी मंदिरात पोहोचले असता संगीताताई यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये पाहणी केली असता, संगीताताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
हेही वाचा: माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
वीरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून, प्राथमिक तपासात संगीताताई पवार झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळावर श्वानपथक देखील पाठवण्यात आले आहे. मंदिराच्या कुलुपाची तोडफोड झाल्याचेही लक्षात आले असून, चोरीचा कोन तपासण्यात येत आहे.
संगीताताई पवार या अध्यात्मिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांनी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आश्रमात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक लोकांमध्ये त्या विशेष आदराने पाहिल्या जात होत्या.
हेही वाचा: माजी आमदार राजा राऊत यांच्या चिरंजीवाचा शिव्या देतानाचा व्हिडीओ वायरल
घटनेबाबत आमदार रमेश बोरनारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, ही अति दुर्दैवी आणि संतापजनक घटना असल्याचे सांगितले. त्यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून, लवकरच गुन्हेगार गजाआड जातील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.