Wrestler Ashwini Paul Death News: धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर एका सुप्रसिद्ध खेळाडूने आपल्या तीन निष्पाप बालकांसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 28 वर्षीय कुस्तीपटू अश्विनी पौळ (मोहिते) यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या भीषण दुर्घटनेत अश्विनी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा करुण अंत झाला असून, एका चिमुरडीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
किल्ल्यावर जाण्यापूर्वी केक कापला अन् चॉकलेट घेतले
या घटनेतील अत्यंत विषण्ण करणारी बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी अश्विनी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. त्यांनी सोबत केक आणला होता, मात्र सुरक्षा नियमांनुसार आत केक नेण्यास मनाई असल्याने त्यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच मुलांसोबत केक कापला. त्यानंतर आवारात असलेल्या स्थानिक दुकानदाराकडून चॉकलेट्स खरेदी करून मुलांच्या हाती दिली. 90 फूट उंच उपळ्या बुरुजावर चढून त्यांनी प्रथम तिन्ही मुलांना खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः खाली उडी मारली. निष्पाप मृत बालकाच्या तोंडात अर्धवट खाल्लेलं चॉकलेट आढळून आल्याचे समोर आले आहे.
कुटुंबातील जीवितहानी आणि उपचारांची स्थिती
या भीषण दुर्घटनेतील जीवितहानीची माहिती खालीलप्रमाणे आहे:
– अश्विनी मनोहर पौळ (वय 28 वर्ष) – जागीच मृत्यू.
– अजिंक्य पौळ (वय 6 वर्ष, मुलगा) – जागीच मृत्यू.
– क्रांती पौळ (वय 2.5 वर्ष, जुळी मुलगी) – उपचारांदरम्यान मृत्यू.
– वीरा पौळ (वय 2.5 वर्ष, जुळी मुलगी) – गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
पती आणि सासरच्या मंडळींवर छळाचे आरोप
अश्विनी या आधी मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) सेवेत कार्यरत होत्या. पतीच्या आग्रहाखातर त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता आणि गेल्या 3 महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या. सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळूनच आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी केला आहे. या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी पती मनोहर पौळ आणि त्यांच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे.
'महाराष्ट्राची वाघीण' अशी होती क्रीडा क्षेत्रातील ओळख
क्रीडा वर्तुळात अत्यंत आदरणीय स्थान असलेल्या अश्विनी पौळ यांची उल्लेखनीय कारकीर्द:
– क्रीडा क्षेत्रात 'महाराष्ट्राची वाघीण' या नावाने त्यांची खास ओळख होती.
– संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांवर आपले नाव कोरले होते.
– केरळमधील तिरुवनंतपुरम येथे 2007 मधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
– 2008 व 2009 मध्ये अनुक्रमे गुरुदासपूर (पंजाब) आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली.
– 2010 मध्ये भोपाळ, कानपूर, हरियाणा, बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई येथील स्पर्धा गाजवत पदकांची लयलूट केली.
– वडिलांनी घरच्या घरीच बांधलेल्या तालमीत सराव करून त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले होते.