Pune News: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एकोले गावाजवळील लोटस पॉईंट येथे फिरण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव आयुष हरिणखेडे असे असून तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने तो सध्या पुण्यातील कात्रज परिसरात राहत होता. रविवारी तो आपल्या पाच मित्रांसह मुळशी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. निसर्गाचा आनंद घेत असताना मित्रमंडळी लोटस पॉईंट परिसरात थांबली. पावसाळी वातावरणामुळे परिसरात पाण्याची पातळी वाढलेली होती. अशा परिस्थितीत आयुष पाण्यात उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला.
हेही वाचा: Satara Karad Crime : कराडमध्ये धक्कादायक प्रकार! 45 वर्षीय प्रियकरावर कुऱ्हाडीने वार; स्वत: महिलेनंच दिली पोलिसांना खबर
घटनेची माहिती मिळताच मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. दुपारच्या सुमारास पौड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बचाव पथकांना पाचारण केले. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह, घसरडे दगड आणि खोल पाण्यामुळे शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते.
सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आयुषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पथकाला यश आले. मात्र मृतदेह बाहेर आणणेही सोपे नव्हते. नागमोडी रस्ता, चिखल आणि पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकाची मोठी कसरत झाली. अखेर रात्रीच्या सुमारास मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
हेही वाचा: फिल्मी स्टाईलने अपहरण; राजस्थान पार्सलचा बनाव फसला, 3 तासांत आरोपी गजाआड, नेमकं काय घडलं?
या संपूर्ण मोहिमेत सहभागी झालेल्या पथकांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याची खोली, प्रवाह आणि स्वतःची पोहण्याची क्षमता यांचा अंदाज न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
आयुषच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहलीसाठी गेलेला तरुण परत येणार नाही, ही वस्तुस्थिती सर्वांसाठीच वेदनादायी ठरत आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे भान राखणे किती आवश्यक आहे, याची जाणीव ही दुर्घटना करून देत आहे.