Hinjawadi Bus Fire Case: पुणे जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी एका खाजगी कंपनीच्या मिनी बसला आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी दावा केला की, चालकाने स्वतः गाडी पेटवून दिली. कंपनीच्या खाजगी वाहनाला आग लागली तेव्हा कर्मचारीही त्यात प्रवास करत होते. मिनीबसला लागलेल्या आगीमुळे एका खाजगी कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
हिंजवडी मिनीबसला लागलेली आग अपघात नसून घातपात -
हिंजवडी मिनीबसला लागलेली आग अपघात नसून घातपात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तपासात असे दिसून आले आहे की ही आग अपघाती नव्हती तर तो एक कट होता. पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी चालक जनार्दन हंबर्डेकर हा अलिकडेच त्याच्या पगारात कपात केल्यामुळे नाराज होता.
हेही वाचा - Bus Catches Fire in Hinjawadi IT Park: हिंजवडीमध्ये खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला आग, 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पगारात कपात केल्यामुळे चालक नाराज -
चालकाच्या पगारात कपात केल्यानंतर तो नाराज होता. काही दिवसांपूर्वी मिनीबस चालकाचा कंपनीतील काही कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी चालकाने मिनीबस जाळण्याचा कट रचला. अधिकाऱ्याने सांगितले की, जनार्दनचा ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध राग होता, ते चार मृतांमध्ये नव्हते.
मिनी बसमध्ये 14 कर्मचारी -
पुणे शहराजवळील हिंजवडी परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या बसमध्ये 14 कर्मचारी होते. आरोपीने बेंझिन (ज्वलनशील रसायन) खरेदी केले होते. त्याने बसमध्ये आगीसाठी काही कापडही ठेवले होते. बस हिंजवडीला पोहोचताच त्याने काडी पेटवली आणि कापड पेटवून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दनन स्वतः आगीत जखमी झाला होता. परंतु तो इतर कर्मचाऱ्यासह बसमधून खाली उतरण्यात यशस्वी झाला होता.
हेही वाचा - Stray Dogs Attack Girl: नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलीवर हल्ला; घटनेत निष्पाप चिमुरडीचा मृत्यू
चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
दरम्यान, आरोपी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला नंतर अटक केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत 10 प्रवासी गंभीर भाजले. या घटनेत शंकर शिंदे (63), राजन चव्हाण (42), गुरुदास लोकरे (45) आणि सुभाष भोसले (44) या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची आणखी चौकशी पोलिस करत आहेत.