सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू ;गावात शोककळा

पलूस तालुक्यातील रियाज मिरासो इनामदार यांचा अपघातात मृत्यू; बीएसएफ जवान सुट्टीवर आले होते, पत्नी गंभीर जखमी.

सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू ;गावात शोककळा

पलूस: पलूस तालुक्यातील बुर्ली गावातील रहिवासी व बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावात शोककळा पसरली आहे.

रियाज इनामदार हे गुजरात राज्यात बीएसएफमध्ये सेवा बजावत होते. काही दिवसांपूर्वीच ते रजेवर आपल्या कुटुंबास भेट देण्यासाठी आले होते. सुट्टीदरम्यान ते पत्नीसमवेत सासरी गेले होते. तेथून पुन्हा आपल्या मूळगावी बुर्ली येथे परतत असताना अथणी परिसरात त्यांच्या चारचाकी वाहनास खासगी प्रवासी बसची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात रियाज यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुःखद वार्ता समजताच गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. जवान इनामदार हे शांत, संयमी व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रियाज इनामदार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व इतर कुटुंबीय असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ गमावल्याने त्यांच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेक नागरिक, लोकप्रतिनिधी व समाजातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

हेही वाचा :पुण्यात झिपलायनिंग करताना भीषण दुर्घटना: ३० फूट उंचीवरून पडून 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार यांच्या पार्थिवावर 22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या मूळगावी बुर्ली येथे शासकीय इतमामात इतमामात दफनविधी होणार आहे.. या दफनविधीप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा दलांचे प्रतिनिधी, गावकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बीएसएफकडून त्यांना सशस्त्र मानवंदना देण्यात येणार आहे.

देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या जवान रियाज इनामदार यांच्या निधनामुळे गावाने एक कर्तव्यनिष्ठ, शूर आणि देशभक्त सुपुत्र गमावला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number