जालना : मराठा समाजाला राज्य शासनाने मागास ठरवून कायदेशीर तरतुदी करून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले आहे. हे आरक्षण दिले असूनही मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका घेऊन उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जरांगेंच्या या घोषणेला ग्रामस्थांचाच विरोध सुरू झाला आहे.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. पण ग्रामस्थांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. अंतरवाली सराटी गावाचे उपसरपंच आणि आसपासच्या पाच ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी सह्या करून तयार केलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. निवेदनावर सत्तर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
तारखेत बदल
मनोज जरांगे आधी ४ जून पासून उपोषण सुरू करणार होते. पण ग्रामस्थांचा वाढता विरोध बघून त्यांनी उपोषण ८ जूनपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपोषणाची तारीख बदलली तरी ग्रामस्थांचा जरांगेंना असलेला विरोध कायम आहे.