रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण भागातील मुलं काही वर्षांपूर्वी शिक्षणासाठी गाव सोडून शहरांमध्ये वळली. गावच्या शाळेत सर्व सोयी-सुविधांसह विविधांगी शैक्षणिक उपक्रम उपलब्ध झाले तर गावातील विद्यार्थी शहराकडे वळणार नाहीत या उद्देश्याने 1962 मध्ये कडवई गावातील काही मुस्लिमांनी गावातील मुलांच्या भविष्यासाठी एक शाळा सुरू केली. गावांमध्ये स्थानिकांच्या काही पडीक जमिनी होत्या. त्या जमिन मालकांनी शाळेसाठी जमिनी दान केल्या. काही काळानंतर येथे शाळेची वास्तू उभी राहीली. पाहता पाहता शाळेने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली. पुढे ही शाळा जिल्ह्यात महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई म्हणून नावारूपाला आली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सुरुवातीला गावातील लोकांच्या श्रमदानातून शाळेची वास्तू उभी राहिली. कालांतराने शाळेचा विस्तार वाढत गेला. आता या शाळेमध्ये मुलांच्या शिक्षणाबरोबरच सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शाळेच्या व्यवस्थापनाने कालांतराने शाळेचं रूपडं पालटलं, संपूर्ण जिल्ह्यात शाळा नावरूपाला आली. राज्याच्या कानोकोपऱ्यातून शाळेतील प्रवेशासाठी विचारणा होवू लागली. पुढे ही उर्दू शाळा 'महाराष्ट्र हायस्कूल' नावानं प्रसिद्ध झाली. शाळेत अनेक गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला. काही दानशूर व्यक्तिंच्या सहकार्याने शाळेसाठी सोयी-सुविधांनी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात आलं. ज्याचा फायदा बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होवू लागला.
हेही वाचा : नाशिकमध्ये 2027 साठी महाकुंभाची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
सुरुवातीला ही शाळा उर्दू माध्यमाची शाळा म्हणून गावांमध्ये नावारूपाला आली. मात्र नंतर या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. या शाळेत सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अलिकडेच महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 'मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा' या अभियानांतर्गत आधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई गुणवत्तेच्या सर्व टप्प्यांवर यशस्वी ठरली. तालुक्यात प्रथम आल्याने ही शाळा आता संपूर्ण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये करणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं व शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत नागरिक घडावेत आणि त्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने या संस्थेचे निरंतर कार्य सुरू आहे.