शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू, जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!
जळगाव : शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जळगावातील ५० वर्षीय महिलेला या आजाराची लागण झाली असून तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
महिलेच्या प्रकृतीत गेल्या पाच दिवसांपासून बदल जाणवत होता. दोन दिवसांपूर्वी तिला उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी विविध चाचण्या केल्यानंतर तिला गुलियन बॅरी सिंड्रोम झाल्याचे स्पष्ट झाले. हे निदान होताच तातडीने अँटीबॉडीज व औषधोपचार सुरू करण्यात आले असून सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी दिली.
👉👉 हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात जीबीएसचा नवीन रुग्ण आढळला
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीची बैठक बोलावली. आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आजारासाठी विशेष दहा खाटांचा कक्ष तयार करण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात देखील GBS चा एक रुग्ण आढळला होता, मात्र त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी.
👉👉 हे देखील वाचा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार
गुलियन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असून सुरुवातीला स्नायूंमध्ये अशक्तपणा, चालण्यात अडचण, थकवा यासारखी लक्षणे दिसतात. या आजाराची लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी केले आहे.