Wednesday, March 19, 2025 11:16:44 AM

महालक्ष्मी सरस 2025 विक्री आणि प्रदर्शन सुरू

ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे.

महालक्ष्मी सरस 2025 विक्री आणि प्रदर्शन सुरू

मुंबई: ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादने, ग्रामीण कला, संस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.  

राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये 500 पेक्षा अधिक स्टॉल
ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – 2025 ”  उद्घाटन सोहळा दि. 11 फेब्रुवारी, 2025 रोजी बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे होत आहे. 
या   राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये 500 पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 400 आणि इतर राज्यातून साधारण 100 स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे 80 स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे.

मुंबईकरांच्या विशेष पसंतीच्या असलेल्या या भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. तो घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.   

प्रदर्शन  दि. 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान
सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. 11 ते 23 फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे. 
या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे. 

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन” आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी “महालक्ष्मी सरस” चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.


सम्बन्धित सामग्री