विदर्भ: एप्रिलच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानानं नाट्यमय वळण घेतलं आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असून, दुसरीकडे काही भागांत अवकाळीचं सावट गडद होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सर्वच भाग वेगवेगळ्या हवामानाच्या संकटांचा सामना करत आहेत.
विदर्भात प्रखर उन्हामुळे तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला असून, अकोला येथे 44.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. पुढील 24 तासांत इथं उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचं आगमन होणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, असा इशारा दिला गेला आहे. मुंबईत तापमान काही अंशांनी कमी असलं तरी दमट हवेमुळे उष्मा अधिक जाणवत आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी उष्ण-दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह एकूण 9 राज्यांना आयएमडीनं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राजस्थानात 45.6 अंश तापमान नोंदलं गेलं असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरलं आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी भागात नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.