Maharashtra Launches “One Day in Tribal Ashram School” Initiative
मुंबई : राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आदिवासी समाजातील २६ आमदार आणि ४ खासदार प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये राहून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला असून, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे.
याअंतर्गत ७ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे मुक्कामी राहणार आहेत. तसेच इतर आमदार आणि खासदारही विविध आश्रमशाळांमध्ये राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये शिक्षण व्यवस्था, वसतिगृहांची स्थिती, आहार आणि पोषण, आरोग्य सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
👉👉 हे देखील वाचा : जळगावमध्ये हेल्मेट न घातल्यास कठोर कारवाई – पहिल्याच दिवशी २४४ दुचाकीस्वार दंडित!
सरकारने हा उपक्रम फक्त पाहणी करण्यापुरता न ठेवता, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रभावी निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि आदिवासी शिक्षण प्रणालीत सुधारणा घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
यामुळे राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारची भूमिका अधिक बळकट होईल. “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी नवा टप्पा ठरणार आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.